You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

नवोद्योजकांना प्रोत्साहनासाठी “इन्क्यूबेशन सेंटर” योजना

योजनेचा उद्देश: महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या उमेदवारांची नवीन कल्पनांच्या माध्यमातून नवउद्योजक बनण्याची इच्छा आहे त्यांना नवव्यवसाय उभारणीस प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे.

लाभार्थी लक्षगट:

    खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही , अशा जातींचे व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील तरुण नवोद्योजक ज्यांच्या नवनवीन व्यवसाय कल्पनांना अंतिम स्वरूप देवून त्यांच्या नवीन उद्योगांना / व्यवसायास प्रोत्साहन देता येईल असे उमेदवार.

    योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दत: योजनेसाठी निर्धारित शैक्षणिक व तांत्रिक अटी व शर्तीची पूर्तता करणारे अर्जदार यांनी विहीत नमुन्यामध्ये अमृतच्या किंवा अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इनक्युबेशन सेंटर यांच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. जे उमेदवार तांत्रिक पात्रता फेरीत निवडले जातील त्यांनी अर्जाची हार्डकॉपी, आवश्यक सर्व कागदपत्रांसह स्वस्वाक्षरीत (Self-attested) करून अमृतच्या किंवा अमृतने योजनेसाठी निश्चित केलेल्या इनक्युबेशन सेंटरच्या कार्यालयास तांत्रिक फेरीच्या तारखेला जमा करणे बंधनकारक राहील.

लाभार्थी पात्रता निकष:

      1. अर्जदार खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीचा तरुण/तरुणी इच्छुक नवोद्योजक असणे आवश्यक आहे.
      2. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख पेक्षा कमी असल्याबाबत प्राधिकृत अधिकारी यांचा उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक.
      3. अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.
      4. उमेदवाराचे वय ४५ पेक्षा जास्त नसावे.
      5. अर्जदाराकडे स्वत:ची अशी नवीन व्यावसायिक कल्पना / तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे.
      6. योजनांतर्गत प्रोत्साहनपर अर्थसहाय्य कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक राहील.
      7. अर्जदाराने याच प्रयोजनासाठी राज्य किंवा केंद्र सरकार यांच्या इतर समकक्ष अन्य कोणत्याही योजनांमधून रु.१० लाख (अक्षरी रुपये दहा लाख फक्त) पेक्षा जास्तीच्या अर्थसहाय्याचा लाभ घेतलेला नसावा.
      8. उमेदवाराच्या आधार कार्ड व पॅनकार्डची स्वस्वाक्षरीत (Self-attested) प्रत.
      9. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा किंवा त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्याचा तपशील (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) देणे आवशयक. उमेदवाराने जर त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्याचे तपशील दिले असतील तर त्याप्रसंगी कंपनीच्या अन्य निदेशाकांकडून (Cofounders) “ना-हरकत प्रमाणपत्र” देणे बंधनकारक

लाभार्थी निवड प्रक्रिया:

      1. अमृत संस्थेमार्फत व ज्या संस्थेकडून योजना राबविण्यात येईल त्यांचे मार्फत सदर योजनेची वर्तमानपत्रे व सामाजिक माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यात येईल.
      2. अर्जदारांकडून अमृतच्या संकेतस्थळावर अथवा योजना राबविणाऱ्या संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील.
      3. लाभार्थी निवडसाठी प्राप्त अर्जांची संबंधित संस्था व अमृत कार्यालयाकडून संयुक्त प्राथमिक छाननी करण्यात येईल.
      4. त्यानंतर व्यवसायाच्या नवनवीन कल्पनांच्या तांत्रिक व व्यावहारिक दृष्ट्या योग्यायोग्यतेबाबत संस्थेच्या तज्ञांचे समितीद्वारे व अमृत संस्थेच्या प्रतिनिधी समवेत छाननी करण्यात येईल.
      5. या संयुक्त तांत्रिक व व्यावहारिक छाननीत योग्य ठरणाऱ्या अर्जदारांचे अर्ज सर्व तपशिलासह व कागदपत्रांसह अमृतच्या छाननी निकषानुसार अंतिम छाननीसाठी अमृतच्या छाननी समितीच्या विचारार्थ ठेवण्यात येतील.
      6. अमृतच्या निकषानुसार केवळ पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक यांचे मान्यतेने संबंधित संस्थेकडे शिफारस करण्यात येतील व निवड झालेल्या उमेदवारांना निवडलेल्या इनक्यूबेशन सेंटर येथे पुढील मार्गदर्शनार्थ प्रायोजित केले जाईल.

लाभाचे स्वरूप:

      1. निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षण प्रगती अहवालाचे व संस्थेच्या शिफारसीचे आधारे प्रतिंमहा प्रोत्साहनपर अर्थसहाय्य रक्कम रु. २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) फक्त एक वर्षासाठी प्रशिक्षण संस्थेमार्फत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाईल.
          2. इन्क्यूबेशन सेंटर त्यांच्या कडून अमृतच्या लाभार्थ्यांना उपलब्ध होणारे तज्ञांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञान, सॉफ्ट वेअर, मिटिंग हॉल, कार्यालयीन जागा, प्रशासकीय सहाय्य अशा विविध बाबींसाठी प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिमहा रक्कम रु. ६०००/- (अक्षरी रुपये सहा हजार फक्त) अथवा सदर इनक्युबेशन सेंटर यांच्याकडून आकारली जाणारी प्रत्यक्ष रक्कम यापैकी जे कमी असेल ती रक्कम सदर सेंटरला थेट अदा करण्यात येईल.
              3. इन्क्यूबेशन सेंटरकडून त्यांच्याकडील सेवांसाठी आकारली जात असलेली रक्कम रु. ६०००/- पेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वत: संस्थेस भरावी.

<